बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचं घराचं स्वप्न अजितदादांकडून पूर्ण होणार
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
Edit
पुण्यातील भेटीत अजितदादां कडून सूरजला मोठं गिफ्ट
बारामती :- बिग बॉस मराठी च्या पाचव्या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाण याने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील जिजाई या निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत सूरज आणि अजित दादांच्या मनमोकळ्या गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.त्याच वेळी सूरजला गावात नवीन जागा घेऊन घर बांधून देण्याची घोषणा करत त्याबद्दलच्या सूचनाही अजितदादांनी संबंधितांना दिल्या.त्यामुळं सूरज याचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण सहभागी झाला होता.बारामती तालुक्यातील मोढवे येथील रहिवासी असलेल्या सुरजनं आपल्या साधेपणानं महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली.या पर्वाच्या अंतिम फेरीपर्यंत टिकलेल्या सूरजनं विजेतेपद मिळवलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संवाद साधला होता.
शनिवार १२ ऑक्टोबर रोजी सुरजनं अजितदादांची पुण्यातील जिजाई निवासस्थानी जाऊन भेट घेतली.या भेटीत अजितदादा व सूरजमध्ये अनेक विषयांवर गप्पा रंगल्या.यावेळी युवा नेते पार्थ पवार हेही उपस्थित होते. अजित दादांनी सूरजबद्दल माहिती घेत कुटुंबियांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली.त्यांनी बिगबॉस शोबद्दलही सूरजकडून माहिती घेतली.याचवेळी त्यांनी सूरजचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याची घोषणा करत त्याबद्दल संबंधितांना सूचनाही दिल्या.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजितदादांनी सूरजचं कौतुक केलं.सूरज हा आमच्या बारामती तालुक्यातील तरुण असून त्यानं त्याच्या कलेवर बिग बॉस मराठीचं विजेतेपद मिळवलं आहे. त्याचं स्वत:चं घर व्हावं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतला असून त्याला दोन बीएचके घर बांधून दिलं जाणार असल्याचं अजित दादांनी सांगितलं.तसेच सूरजच्या पुढच्या वाटचालीबद्दल अभिनेता रितेश देशमुख यांच्याशीही बोलून पुढचं नियोजन करणार असल्या चं त्यांनी स्पष्ट केले.