सुपे उपबाजाराच्या आवारात बांधले जाणार दीड कोटी रुपयांचे नवीन शेतकरी भवन

सुपे उपबाजाराच्या आवारात बांधले जाणार दीड कोटी रुपयांचे नवीन शेतकरी भवन

 

बारामती:- बारामती तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजाराच्या आवारात दीड कोटी रुपयांचे नवीन शेतकरी भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने 8 जुलै रोजी याला प्रशासकीय मान्यता दिली. 

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवरसचिव माधवी शिंदे यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत सुप्यातील उपबाजारात नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी शासनाने 1.52 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. यातील 76.46 लाख रुपये सरकार अनुदान देणारा असून हे अनुदान दोन टप्प्यात 50 50 टक्के प्रमाणात मिळणार आहे तर उर्वरित निधी हा बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून बांधकाम करण्याचे बंधनकारक राहणार आहे.

त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याची माहिती दिली होती. या निमित्ताने बारामती तालुक्यातील जिरायती समजणाऱ्या सुपे गावच्या बाजारपेठेला प्रगतीची मोठी संधी मिळणार आहे.

ज्ञानेश्वर पोमणे, (माजी सरपंच बाबुर्डी) : थोड्या दिवसात सुपे हे अजितदादा पवार यांच्यामुळे पुणे जिल्ह्यात विकासाचे एक आदर्श माॅडेल झालेलं सर्वांना पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत प्रचार दरम्यान दादांनी जिरायती शब्द पुसण्याचा शब्द दिला आहे. दादा हे शब्दाचे पक्के आहेत. दिलेल्या शब्दानुसार ते काम करत आहेत.

राजकुमार लव्हे, (प्रगतशील शेतकरी बाबुर्डी) : सुप्यासह आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांची देखील आर्थिक प्रगती या निमित्ताने होणार आहे. सुपे उपबाजार हा अधिक सुविधांनी युक्त झाल्यानंतर या ठिकाणचे शेतमालाचे लिलाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. साहजिकच जिरायती भागातील अर्थसमृद्धीसाठी ही सुरुवात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.