विक्रीसाठी लंगड्या कोंबड्या नको म्हणणाऱ्या ड्रायव्हरचा मारहाणीत मृत्यू
इंदापूर तालुक्यातील गालांडवाडी नं १ येथील विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फार्म वरती रियाज चुन्नुमीया जहागिरदार (वय ५२ ,रा. सय्यदनगर, लेन नं-२६ एक ,नुर मज्जित जवळ हडपसर ता. हवेली, जि. पुणे) हे कोंबड्या गाडीत भरून घेऊन जाण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी कोंबड्या भरत असताना पोल्ट्री फार्म वरील कामगारांना लंगड्या कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. त्या कंपनीमध्ये घेतल्या जात नाहीत असे रियाज चुन्नुमीया जहागिरदार म्हणाले.
लंगड्या कोंबड्या आणू नका म्हणल्यानंतर विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फार्मवरील कामगार निखिल जाधव, विकी नलवडे, लहू शिंदे (रा. गलांडवाडी नं-१, ता- इंदापूर, जि- पुणे) व विशाल कांबळे (रा-शिरसोडी ता- इंदापूर, जि- पुणे) यांनी रियाज चुन्नुमीया जहागिरदार यांना हाताने तोंडावर व डोक्यामध्ये बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.
या झालेल्या मारहाणीमध्ये रियाज चुन्नुमीया जहागिरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागेवरती बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ बारामती येथे उपचारासाठी नेले व तेथून ससून हॉस्पिटल पुणे ते उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मारहाण केलेल्या काही आरोपींना इंदापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून पुढील कारवाई इंदापूर पोलीस करत आहेत. मात्र एखाद्या लंगड्या कोंबडीसाठी व्यक्तीचा जीव घेणे, ही अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना घडली आहे.