
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले, नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
नाशिक : चर्चेतील हनी ट्रॅपसंदर्भातील वेगवेगळे मुद्दे बाहेर येत आहेत. महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकविल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १० कोटींची मागणी झाल्याने संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला व या प्रकरणाला वाचा फुटल्याची चर्चा आहे.
अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने अब्रूच्या भीतीने तीन कोटी रुपये दिले. पण आणखी १० कोटींची मागणी झाल्यावर त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेने नाशिक पोलिसांकडे अगोदर शोषणाची तोंडी तक्रार केली. पोलिसांनी या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता आम्ही समन्वयाने तोडगा काढतो, असे त्याने सांगितले. काही दिवसांनी सदर महिला लेखी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आली. या काळात संबंधित अधिकारी ठाणे येथे गेला असता त्याची प्रकृती बिघडली. तेथे त्याने या महिलेविरोधात तक्रार दिली. परंतु, पुन्हा उभयतांत काही समझोता होऊन परस्पर विरोधी तक्रारी मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. संबंधित अधिकारी किंवा अन्य कोणाचीही अधिकृत तक्रार नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.
शनिवारी एका पथकाने नाशिकमध्ये येऊन संबंधित हॉटेलची तपासणी केली तसेच हॉटेलची रूम सील केल्याची चर्चा आहे. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा इन्कार केला. तथापि, सध्या हॉटेलच्या त्या मजल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचा ‘तो’ नेता कोण?
विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांनी एका काँग्रेस नेत्याचे हे हॉटेल असल्याचे सांगून त्याचे नाव माहीत असले तरी स्पष्ट करणार नाही, असे म्हटले होते. नाशिकमध्ये संबंधित नेत्याच्या नावाची चर्चा सुरू असली तरी अद्याप ऑन रेकॉर्ड त्याचे कोणीही नाव घेतलेले नाही.