
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; नेमके कारण काय?
मंगळवार, २२ जुलै, २०२५
Edit
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड
यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी,
सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय सल्ल्यानुसार
आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी
राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला असून, तो
संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) नुसार देण्यात आला आहे. धनखड यांनी ऑगस्ट
२०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांचा कार्यकाळ २०२७
पर्यंत होता.
धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, "माझ्या
कार्यकाळात राष्ट्रपतींबरोबर सौहार्दपूर्ण आणि शांत वातावरणात काम करता
आले, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे सहकार्यही
मला सतत लाभले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. खासदारांकडून
मिळालेला विश्वास, प्रेम आणि आधार मी कायम स्मरणात ठेवेन," असेही
उपराष्ट्रपतींनी राजीनाम्यात म्हटले आहे.
संसदेचे अधिवेशन सुरू असताना राजीनामा देणारे धनखड हे पहिले उपराष्ट्रपती आहेत. धनखड यांनी २०२२ मध्ये १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी ७२५ पैकी ५२८ मते घेत विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. अल्वा यांना १८२ मते होती.