विदर्भात आज रेड अलर्ट; मुसळधारेसह अतिवृष्टीही शक्यता, प्रशासन सतर्क, कसे असेल हवामान? जाणून घ्या

विदर्भात आज रेड अलर्ट; मुसळधारेसह अतिवृष्टीही शक्यता, प्रशासन सतर्क, कसे असेल हवामान? जाणून घ्या

 

बारामती:- विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पुढील दोन दिवस अत्यंत कठीण व अग्निपरीक्षेचे राहणार आहेत. कारण प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारी रेड व ऑरेंज अलर्ट, तर शनिवारी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.

त्यामुळे मुसळधारेसह अतिवृष्टीही दाट शक्यता आहे. धो-धो पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली.

ढगाळ वातावरण असूनही केवळ मोजक्याच भागांमध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळच्या सुमारास हलका शिडकावा झाला. नागपूरकरांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे कमाल तापमानही साडेचार अंशांनी घसरून २९ अंशांवर आले. उल्लेखनीय म्हणजे, बुधवार व गुरुवारच्या रात्री रात्रभर ब्रेक घेत पावसाची रिपरिप सुरू राहिली. परिणामी शहरात चोवीस तासांत ४५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

जोरदार पावसासाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातही शुक्रवारी व शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येदेखील पुढील दोन-तीन दिवस यलो व ऑरेंज असल्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तिन्ही अलर्ट असल्यामुळे साहजिकच प्रशासनही ‘ॲक्टिव्ह मोड’वर आहे. या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्वतःसह दुसऱ्याचीही आवश्यक काळजी घ्यावी, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.