
बारामतीत वरिष्ठ बँक मॅनेजरने शाखेतच आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीने खळबळ, डोळे पाणावणारी अखेरची इच्छा
बारामती : पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिगवण रस्त्यावरील 'बँक ऑफ बडोदा' बँकेच्या शाखेत काल, गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे. बारामतीतील बँकेच्या शाखेतच आत्महत्या करण्याचा असा पहिलाच प्रकार असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले आहेत.
काय आहे प्रकरण?
शिवशंकर मित्र हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असून ते गेली अनेक वर्ष बँका बडोदा मध्ये काम करत आहेत. मात्र वरिष्ठांचा मोठा दबाव असल्याने गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर मित्र तणावात असल्याचे बोलले जाते. त्यांनी या संदर्भात घरच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
पाच-सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ही नोकरी सोडायची होती, ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू नका असे म्हणत होते, मात्र कोणीच ऐकले नाही. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे स्पष्ट केले आहे.
शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?
दरम्यान, "आपल्या मृत्यूनंतर बँकेने आपली इच्छा पूर्ण करावी व कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त दबाव टाकू नये, प्रत्येक कर्मचारी आपल्या परीने शंभर टक्के योगदान देत असतो. त्यामुळे बँकेने अशा प्रकारचा कोणताही दबाव टाकू नये. मी माझी आत्महत्या पूर्ण इच्छेने व जबाबदारीने करत आहे. याला माझ्या कुटुंबाला जबाबदार धरू नये. केवळ आणि केवळ बँकेच्या अतिरिक्त दबावामुळेच मी आत्महत्या करत आहे" असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिले आहे.