खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
बुधवार, २३ जुलै, २०२५
Edit
पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली. हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील
अलवर जिल्ह्यातील मुण्डावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय कला गावात
घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेतले असून पुढील तपासाला
सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी त्याची गेल्या काही दिवसांपासून धडपड सुरू होती. अशातच त्याची एका मांत्रिकाशी भेट झाली. पत्नीला परत आणायचे असेल तर, एका लहान मुलाचा बळी देऊन त्याचे रक्त आणि काळीज आणावे लागेल, असे त्या मांत्रिकाने आरोपीला सांगितले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपीने स्वत:च्या पुतण्याची हत्या केली.
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
आरोपीचा पुतण्या
लोकेश बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबातील सदस्यांनी लोकेशचा शोध सुरू
केला. त्याचवेळी गावातील एका पडिक घरात लोकश मृतावस्थेत आढळून आला. लोकेशची
हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील
तपास सुरू केला असता त्यांना आरोपी चुलत्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी
आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने
पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने
हत्येची कबूली दिली.
मांत्रिकाच्या सांगण्यावरून पुतण्याचा बळी
आरोपीने
पोलिसांना दिलेल्या जबाबात असे म्हटले की, बायकोला वश करण्यासाठी एका
मांत्रिकाने त्याच्याकडून १२ रुपये आणि एका लहान मुलाच्या बळीची मागणी
केली. मांत्रिकावर विश्वास ठेवून आरोपीने त्याच्या पुतण्याचा बळी देण्याचे
ठरवले. आरोपीने पुतण्याला गावातील एका पडिक घरात नेऊन त्याचा गळा आवळून
हत्या केली.