
भाजपात प्रवेश करणार? अखेर जयंत पाटील यांच्याकडून सर्वात मोठा खुलासा
मंगळवार, १५ जुलै, २०२५
Edit
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा दोन
दिवसांपासून सुरु आहे. अर्थात खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताचं खंडन
केलं आहे. तसेच या चर्चांनंतर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार
असल्याच्या चर्चांनादेखील जोरदार उधाण आलं. याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण
आल्यानंतर अखेर जयंत पाटील हे माध्यमांसमोर आले. त्यांनी आपल्याबाबत सुरु
असलेल्या विविध चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा
राजीनामा दिलेला नाही. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं आहे,
असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
"भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी
कुणी मला विचारलेलं नाही आणि मी कुणाला तशी विनंती केलेली नाही. एखादा
प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस, त्याच्याबाबत एवढ्या वावड्या उठणे, तो कोणत्या
पक्षात जात आहे, याबाबत तुम्हीच सगळे ठरवायला लागले. मला आश्चर्य वाटतं.
मला आताच सहाय्यकाने बातमी पाठवली की, बातम्या चालू आहे. मलाही आश्चर्य
वाटतंय. सूत्र कुठे आहेत मला दाखवा जरा. मला त्या सूत्रालाच भेटायचं आहे.
असं कधी असतं का?", असं जयंत पाटील म्हणाले.
"कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते. एखाद्या साध्या गोष्टीसाठी कुणी
कुणाला भेटलं तरी आपण पराचा कावळा करतो. त्यामुळे अशी कोणतीही परिस्थिती
नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे.
मी त्या पक्षाचं काम करतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही
कार्यकर्ते आहोत. अशा सारख्या बातम्या येत असतात. त्या हळूहळू विरुन
जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी मी नाही, असं कशाला सांगायचं", असं जयंत पाटील म्हणाले.
'अशा बातम्यांमुळे बदनामी होते पण प्रसिद्धी सुद्धा मिळते'
"ज्या
वृत्तवाहिन्या अशा बातम्या देतात त्या माझं चांगल्या बातम्याही देतात.
त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून उगाच
कटुता निर्माण करणं योग्य नाही. अशा बातम्यांमुळे बदनामी होते पण त्याबरोबर
प्रसिद्धी सुद्धा मिळते. हा दुसराही भाग आहे. नाहीतर लोकं विधानसभेचे 10
सदस्य असणाऱ्यांच्या अध्यक्षाला एवढं महत्त्वं देत असतील तर त्या
प्रसारमाध्यमांचेदेखील आभार मानले पाहिजेत", असं जयंत पाटील उपरोधिकपणे म्हणाले.
"भाजपने
माझ्याशी थेट संपर्क साधलेला नाही. भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत
त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी व्यक्तीगत वैर कुणाशी करत नाही.
त्यामुळे भाजपच्या नेत्याशी बोललं, मुख्यमंत्र्यांना भेटलो की त्या पक्षात
जाणार अशी चर्चा होते", अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.