'सातारा जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट'; कोयना धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांनी उचलले, सावधानतेचा इशारा
दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात आज सकाळपासून पावसाचा जोर थोडासा मंदावला आहे. मात्र, शनिवारी दिवस- रात्र पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाण्याची आवक ५० हजार क्युसेकपेक्षा अधिक झाली होती. परिणामी, पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडून २९ हजार ६४६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला, तर पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट सुरू असल्याने त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ८५.२९ टीएमसी झाला आहे, तर नदीतील मोठ्या विसर्गामुळे आज मुळगाव पुलाला पाणी लागले आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेडस् लावून प्रशासनाने बंदोबस्त सुरू केला आहे.
शुक्रवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाल्यावर बंद असलेले सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी ११ वाजता चार फुटांनी व सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा एक फूट उचलून प्रतिसेकंद २० हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला होता. मात्र, रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत राहिल्याने २४ तासांत धरणामध्ये ४.४० टीएमसी पाण्याची भर पडली आहे.
त्यामुळे धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांवर नेण्यात आले आहेत. दरवाजे साडेसहा फुटांवर नेल्याने विसर्गात वाढ झाली असून, मध्यरात्रीच्या दरम्यान मुळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ८४ (२९०१) मिलिमीटर, नवजाला १३१ (३१६५) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १८१ (३२५४) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, २० जुलैनंतर जिल्ह्याच्या सर्वदूर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नदी, नाल्यांना पाणी वाढू लागल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काल (शनिवार) बहुतांश धरणांतून काल नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.