
चाकण, हिंजवडी, मांजरी स्वतंत्र महानगरपालिका करणार : अजित पवारांची मोठी घोषणा
चाकण: पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागतील. मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची, चाकण आणि हिंजवडी अशा तीन महापालिका कराव्या लागणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चाकण (ता.खेड) येथील वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली.
पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील रस्ते व वाहतूक कोंडीची शुक्रवारी (दि.८) सकाळी सहा वाजल्या पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी पोलिस आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त आणि महामार्ग तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांनी पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण मधील तळेगाव चौकात पाहणी केली.याच चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावे लागते.यावेळी त्यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले.पवार म्हणाले की, कुणाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी मिळणार नाही.
पोलिस अधिकाऱ्यांना खडसावले
अजित पवार पाहणी करण्यासाठी तळेगाव चौक येथे थांबलेले असताना पोलिसांनी पुण्याहून नाशिक कडे जाणारी वाहतूक रोखून धरल्याने तळेगाव चौक ते आळंदी फाटा भागात प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.पवार म्हणाले की. मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग 'पिक टाईम'मध्ये काय अवस्था होत असेल, वाहने रोखून धरल्याने उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. हे बरोबर नाही. ही वाहने थांबवून कोंडी का केलीय?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या.
चाकण एमआयडीसीमध्ये १५०० हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. रस्त्याची कामे होत नाहीत , त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण झालेले आहे. वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून ही समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क, चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहेत.