पत्नी-सासूची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने खळबळ
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील कुलियाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या नुआगावात एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. १९ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन महिलांचे कुजलेले मृतदेह त्यांच्या घराच्या मागे पुरलेले आढळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या हत्याकांडातील मृतांची ओळख २३ वर्षीय सोनाली दलाई आणि तिची आई ५५ वर्षीय सुमती दलाई अशी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोनालीचा पती आणि सुमतीचा जावई असलेल्या देवाशिष पात्रा याला अटक केली आहे.
हत्या कशी घडवली गेली?
प्राथमिक तपासात उघड झालं, की १९ जुलै रोजी आरोपीने दगडाने ठेचून दोघींची हत्या केली. नंतर घराच्या मागे खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरले आणि गुन्हा लपवण्यासाठी वर केळीचे झाड लावले. काही दिवसांपासून सोनाली आणि तिची आई बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी कुलियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गावकऱ्यांना संशय कसा आला?
गावकऱ्यांच्या लक्षात आले, की देवाशिषच्या घराजवळील माती अलिकडेच खोदण्यात आली होती. तसेच सोनालीच्या सततच्या अनुपस्थितीमुळे शंका निर्माण झाली. गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घराच्या मागील भागात खोदकाम केले असता मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पूर्वीचा कायदेशीर वाद
पोलिस तपासानुसार, आरोपी देवाशिषचा पूर्वी एका आरोग्यसेवा कर्मचाऱ्याशी विवाह झाला होता आणि सध्या तो तिच्याशी कायदेशीर वादात अडकला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने सोनालीशी दुसरे लग्न केले होते. घरगुती वाद आणि तणावातूनच हा दुहेरी खून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र यामागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल.
संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक कुमार गोचायत यांनी सांगितले, की "सोनाली आणि तिची आई बराच काळ बेपत्ता होत्या. संशयित देवाशिषला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने कबुली दिली की घराच्या मागे खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरले आणि वर केळीचे झाड लावले. पोलिसांनी घटनास्थळी जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढले आणि आरोपीला अटक केली आहे."
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या दुहेरी खुनामुळे नुआगाव आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती कलह किती टोकाला जाऊ शकतो याचे हे भयावह उदाहरण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.