नांदणीनंतर 'या' मठांचे ३ हत्तीही जाणार? हायकोर्टाकडून नोटीस

नांदणीनंतर 'या' मठांचे ३ हत्तीही जाणार? हायकोर्टाकडून नोटीस

 

बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ येथील श्री शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, श्री करीसिद्धेश्वर मठ अलकनूर (ता. रायबाग), गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर बिचले (जिल्हा रायचूर) यांच्याकडे असलेल्या हत्तीबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तेथील तीन हत्तींचे हाल होत असल्याचे कर्नाटक वनविभागाचे मत आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी जून २०२५ मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल करत तातडीने या हत्तींच्या सुटकेची मागणी केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रतिवादींना चार ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

जर प्रतिवाद्यांनी उत्तर दिले नाही, तर न्यायालय त्यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. २८ जुलै २०२५ ला नांदणी (जि. कोल्हापूर) येथील महादेवी हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील जामनगर येथे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर कर्नाटकातील आश्रम, मठ, मंदिरांना हत्तींबाबत उच्च न्यायालयाने नोटीस दिल्या आहेत.

याचिकेत शेडबाळची राजणीबाई उर्फ पद्मा हत्तीण, अलकनूर ध्रुव हत्ती आणि रायचूरच्या मेनका या हत्तींचे हाल होत आहेत. संबंधित हत्तींच्या त्वरित सुटकेची आणि त्यांना बंगळूर येथील बन्नेरघट्टा हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्याची मागणी केली आहे. हत्तीण पद्माला १५ तासांहून अधिक काळ बंदिस्त जागेत बांधले जात आहे. मिरवणुकांमध्ये कोणताही परवाना न घेता मानवी वस्तीत फिरवले जाते. तिला साखळदंडाने बांधल्याने तिच्या पायांना जखमा झाल्याचे याचिकेत नमूद केले आहे. ध्रुव नावाच्या हत्तीलाही जखमा झाल्या आहेत. त्याला गँग्रीनसारखा आजार होण्याची शक्यता आहे. हत्तीण मेनकाला बांधण्यात आलेल्या साखळ्यांमध्ये खिळे लावले गेले आहेत. हे खिळे सतत तिच्या त्वचेत टोचत असल्यामुळे तिला प्रचंड वेदना होत आहेत, असे फोटो याचिकेत जोडले आहेत.

ध्रुवने माहुतचा जीव घेतल्याचा संदर्भ

हत्ती ध्रुवने २३ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या माहुतचा जीव घेतल्याची माहितीही याचिकेत दिली आहे. ध्रुवला मानसिक आणि शारीरिक छळ व एकांतात त्रास होत होता, यामुळे या हत्तीने असे कृत्य केले, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी २१ जून २०२४ रोजी कर्नाटक वनविभागाला पत्र पाठवून पद्मा, ध्रुव आणि उमा बेडकिहाळ (जि. बेळगाव) हत्तींच्या गंभीर अवस्थेबद्दल सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांत उमा हत्तीचा मृत्यू झाला, परंतु या पत्राची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. याचिकाकर्ते जी. आर. गोविंद हे पर्यावरणतज्ज्ञ आणि हत्ती संवर्धन कार्यकर्ते आहेत. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे, मठ आणि प्राणीसंग्रहालयांमध्ये कैदेत असलेल्या हत्तींच्या पुनर्वसनासाठी काम केले आहे.