दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?
गणपती विसर्जनानंतर आता सर्वांना दसरा आणि दिवाळी या सणांची ओढ लागली आहे. सणासुदीचे दिवस म्हटलं की विविध वस्तूंनी बाजार अन् बोनसनं खिसा फुललेला असतो. त्यामुळं सगळीकडं चैतन्याचं वातावरण असतं. अशातच यंदा केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा १.२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. याची घोषणा दिवाळीच्या तोंडावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.
केंद्र सरकारनं जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली तर हा भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. नव्या दरानं महागाई भत्ता हा जुलै २०२५ पासून लागू होईल. त्यामुळं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्याचा अॅरियर्स मिळेल. हा अॅरियर्स ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त फायनांशियल एक्सप्रेसने दिलं आहे.
दुसऱ्यांदा होणार महागाई भत्त्या वाढ
सरकार वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ करते. होळीपूर्वी म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. त्यानंतर दिवाळीपूर्वी म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्त्यात बदल होतो. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं १६ ऑक्टोबर २०२४ मध्ये महागाई भत्त्यात वाढ केली होती. ही वाढ सणासुदीच्या आधी दोन आठवडे करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी दिवळी २० - २१ ऑक्टोबरला येणार आहे. त्यामुळं सरकार महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा ही त्यापूर्वी करून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल.
महागाई भत्त्याचं कसं होतं कॅलक्युलेशन?
सातव्या वेतन आयोग कंज्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्सचा (CPI-IW) वापर करून महागाई भत्ता ठरवतं. या फॉर्मुल्यानुसार कंज्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स डाटाच्या १२ महिन्यांची सरासरी काढली जाते. जुलै २०२४ ते जून २०२५ मध्ये CPI-IW ची सरासरी १४३.६ इतकी आली होती. त्यानुसार महागाई भत्ता हा ५८ टक्के इतका होतो. याच अर्थ यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
पगार अन् पेन्शन कितीनं वाढणार?
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ही ५० हजार असेल तर जुन्या ५५ टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला २७ हजार ५०० रूपये भत्ता मिळत होता. नव्या ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला आता हाच भत्ता २९ हजार रूपये इतका मिळेल. याचा अर्थ कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला दीड हजार रूपये जास्त मिळणार आहेत.
तसंच जर एखाद्या माजी कर्मचाऱ्याची बेसिक पेन्शन ही ३० हजार रूपये असेल तर त्याला नव्या ५८ टक्के दराने १७ हजार ४०० रूपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजे प्रत्येक महिन्याला ९०० रूपये जास्त मिळतील. ही ढोबळ आकडेवारी झाली. प्रत्येकाला मिळणारा फायदा हा त्याच्या पगार आणि पेन्शनवल आधारित असेल.
विशेष म्हणजे हा सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता असेल. कारण सातवा वेतन आयोग हा ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होत आहे. सरकारनं जानेवारी २०२५ मध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. मात्र अजून त्याचा टीओआर (टर्म्स ऑफ रेफरन्स) निश्चित झालेले नाहीत. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही २०२७ च्या शेवटी किंवा २०२८ च्या सुरूवातीला होऊ शकते.