
बारामतीच्या माळावरच्या देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात सुरू
उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमीनिमित्त देवीची काठी उभारली जाईल. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त होम-विधी होईल, तर बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी नवमीचे घट उठवले जातील. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला (दसरा) रात्री १२ नंतर देवीच्या पालखीचे सिमोल्लंघनासाठी प्रस्थान होईल. नवरात्र काळात मंदिर भाविकांसाठी दररोज पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
गेल्या सहा पिढ्यांपासून गाढवे कुटुंबीय या नवरात्रोत्सवाची परंपरा जपत आहेत. यामध्ये हरिभाऊ गाढवे, सोमलिंग गाढवे, अतुल गाढवे, राहुल गाढवे, प्रमोद गाढवे, प्रशांत गाढवे आणि दिनेश गाढवे यांचा सक्रिय सहभाग असतो. मंदिराच्या परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जळोची येथील देवीचे निस्सीम भक्त कै. दत्तात्रय गाढवे यांना वयोमानामुळे तुळजापूरला जाणे शक्य होत नव्हते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि ते चालत असताना ज्या ठिकाणी त्यांनी मागे वळून पाहिले, त्या ठिकाणी देवी प्रकट झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले असून, ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून याची ओळख आहे.