कर्जमाफीचा रेटा वाढला; उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा अतिवृष्टी भागात दौरा

कर्जमाफीचा रेटा वाढला; उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा अतिवृष्टी भागात दौरा

 

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुमारे ४७ टक्के खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे. महापुरामुळे शेती आणि पिके खरवडून गेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरून काहीच राहिले नाही, जनावरे वाहून गेली. त्यामुळे शेतकरी जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे. राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजारांची मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरसकट कर्जमाफीसाठी गुरुवारी आवाज उंचावला.

पाऊस थांबल्याने मराठवाड्यातील गोदाकाठचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी अनेक भागांत शेतशिवारात पाणी कायम आहे. केवळ पिके नाहीत, तर घर, जनावरे आणि शेतीची नुकसानभरपाईही द्यावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार असताना केलेल्या कर्जमाफीची आपण कधीही जाहिरातबाजी केली नाही.

आता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई होऊ शकत नाही. महापुरामुळे शेती, पिकांचे नुकसान झाले. जनावरे वाहून गेली. अशा स्थितीतून पूर्णतः खचून गेलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्याचा दौरा करावा. त्यांनी ही विदारक स्थिती पाहून केंद्राकडून भरीव मदत देणे गरजेचे आहे अशी मागणी ठाकरे यांनी केली. पुरामुळे आता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, ते कर्जमाफीसाठी पुरेसे नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

धाराशिव जिल्ह्यात दौरा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर येथे उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. शेती, पीक, घरांच्या नुकसानीची गुरुवारी पाहणी केली. त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधला. कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजारांच्या मागणीसह अन्य प्रकारच्या भरपाईसाठी आपण शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू, अशा शब्दांत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

कुंभमेळा, शक्तिपीठाचा निधी वळवा

शक्तिपीठ आणि कुंभमेळ्यासाठी ठेवण्यात आलेला निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे वळवावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना, मदतीच्या संदर्भात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील आहे, असे मतही सपकाळ यांनी जालना येथे व्यक्त केले.