
आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; जाणून घ्या, कुठे आणि किती पाऊस पडणार..
गेल्या काही दिवसांत राज्यभरातील मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. विशेषतः मराठवाड्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण गेल्या दोन-तीन दिवसांत कमी झाले असले, तरी आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची चिन्हे आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची पश्चिमेकडे वाटचाल होत असल्याने राज्यभरात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पावसामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या धरणातून नदीपात्रात पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे.
पुण्यासह राज्यात २७ सप्टेंबरपासून पुढील काही दिवस पावसाचे असणार आहेत. त्यातही २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण जास्त राहून जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. ३० सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन दिवसभरात काही सरी पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले.