
“आमचा निर्णय झालाय”, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ज्यांची जमीन खरडून गेलीय…”
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे मागणी केली की पूरग्रस्तांना सरकारने मदत करावी, अनेक शेतकऱ्यांचं पिक वाहून गेलं आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. यावर अजित पवार म्हणाले, “मी हे सगळं पाहायला इथे आलो आहे. पाणी ओसरू द्या, किती रान वाहून गेलं आहे ते पाहू द्या, ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत, ती मळीची जमीन असते ती वाहून गेली असेल तर त्यासंदर्भात आमचा निर्णय झाला आहे. एकदा पाणी ओसरू देत, सर्वांना सरकार मदत करेल.
अजित पवार म्हणाले, “संध्याकाळपर्यंत पाणी ओसरेल. पूरग्रस्तांपर्यंत सगळी मदत पोहोचवली जाईल. दूध, भाजीपाला पोहोचवला जाईल. शाळकरी मुलांची व्यवस्था केली जाईल. यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच पूरग्रस्त भागाचे पंचनामे होतील. कोणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
शेतकऱ्यांना, नागरिकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही : अजित पवार
उपमुख्यमंत्री म्हणाले, “सीना नदीला आलेल्या पूराचा मोठा फटका बसला आहे. सीना नदीवरील बंधाऱ्यावरून १७ ते १८ हजार क्युसेक क्षमतेने पाणी वाहतंय. त्यामुळे पलीकडच्या गावांना मोठा फटका बसला आहे. सरकार सगळी मदत पोहोचवतंय. वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मी नदीच्या पलीकडे जाणार होतो. परंतु, बोट पंक्चर झाली. त्यानंतर ट्रॅक्टर मागवला तोही बंद पडला.
“नदीवरील पूलांचं नुकसान झालं आहे, त्याची दुरुस्ती होईल, काही पुलांची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना, इंजिनियर्सना सूचना दिल्या आहेत. १५ ऑक्टोबरपूर्वी त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसंदर्भात निर्णय घेतला आहे. विशेषतः सीना नदी, मांजरा नदी, गोदावरी नदीच्या आसपासच्या गावांसंदर्भात निर्णय घेतला आहे.”