दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

 

पुणे: राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 66 लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून, माती आणि पशुधन वाहून जाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून सुरू असून बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे दिली. शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नये, संकटसमयी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असल्याचेही ते म्हणाले.

डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या (डीएसटीए ) वार्षिक परिषद सोमवारी पार पडली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना ते म्हणाले, सततचा पाऊस विशेषतः एकाच दिवशी होत असलेला अतिमुसळधार पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे.

अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लवकरच निर्णय घेतील. सरकारकडून या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. राज्यात मेपासून ते आतापर्यंत झालेल्या नुकसानीत पिकांचे, जमिनीचे वा इतर हानी लक्षात घेऊन बाधित घटकाला मदत मिळेल, असेही त्यांनी सांगीतले.

साखर उद्योग हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. संचालक मंडळ, खाजगी कारखाना मालक, पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे कारखान्यांमध्ये नव्या प्रयोगांची अंमलबजावणी होत आहे. ज्याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

कृषिमंत्री काय म्हणाले?

कृषिमंत्री म्हणून आम्हाला खूप तोलून-मापून बोलावे लागते. एखाद्या अनवधानाने उच्चारलेल्या शब्दाचीही बेकिंग बातमी होते.‌‘डीएसटीए असोसिएशन‌’ची बैठक असून, शांतपणे आपण बसलो आहोत. माणसाने आयुष्यात आनंदी राहिले पाहिजे.

आपण आनंद दुसऱ्याला द्यायचा असतो आणि घ्यायचाही असतो. प्रत्येकाला सुख-दुःख आहेच. दुसऱ्याचे सुख पाहून आपण बोलतो. परंतु, त्यांचे दुःख त्यांनाच माहिती असते. नवीन तंत्रज्ञान साखर उद्योगात कसे आणता येईल आणि गरीब शेतकऱ्यांना ते ज्ञान कसे देता येईल, यावर डीएसटीए संस्था काम करीत असून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.