लाल रंगाच्या स्विफ्टच्या संशयास्पद हालचाली, नाकाबंदी लावली अन्...; पोलिसांकडून त्या रॅकेटचा पर्दाफाश

लाल रंगाच्या स्विफ्टच्या संशयास्पद हालचाली, नाकाबंदी लावली अन्...; पोलिसांकडून त्या रॅकेटचा पर्दाफाश

 

पुणे: वडगाव निंबाळकर पोलिसांनी करंजेपूल बस स्टॉप परिसरात मोठी कारवाई करत अवैध वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित लाल रंगाच्या स्विफ्ट गाडी (क्र. MH 11 MD 8055) बद्दल माहिती मिळाल्याने पोलिसांनी नाकाबंदी लावली. गाडीची तपासणी केली असता, त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आढळला.

महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. यामध्ये दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने हडपसर, पुणे येथून लोणंद येथे आणून वेश्या व्यवसायास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले.

मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

या प्रकरणी दोन सराईत आरोपी, सुयोग हिंदुराव खताळ आणि प्रीतम आप्पासाहेब घुले (दोघेही रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईतून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक डी.एस. वारुळे, हवालदार अमोल भोसले, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव आणि नागनाथ परगे यांचा समावेश होता.