
दीड वर्षात तीनपट जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ब्लॉक ऑरा कंपनीकडून गुंतवणूकदरांची फसवणूक
बारामती: दीड वर्षात तीनपट जादा परतावा देण्याच्या आमिष दाखवत ब्लॉक ऑरा कंपनीने बारामतीसह परिसरातील अनेकांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी काहीच केले नाही अशा आविर्भावात खुलेआम फिरत आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही पोलिस यंत्रणेकडून कसलीच दखल घेतली जात नसल्याचा अनुभव गुंतवणूकदारांना येत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करूनही कंपनी संचालकांसह स्थानिक प्रतिनिधींना अभय मिळाले आहे.
बारामतीतील एस. ए. काझी हे २०२२ मध्ये कामानिमित्त एमआयडीसीत गेले असताना त्यांना नंदन पवार या व्यक्तीने ब्लॉक ऑरा कंपनीतील गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. दीड वर्षात तुम्हाला तीनपट रक्कम मिळेल असं त्यांना सांगण्यात आलं. तसेच रॉयल इन या हॉटेलमध्ये आयोजित सेमिनारसाठी येण्यास सांगितलं. त्यावेळी पवार या व्यक्तीने काझी यांना बारामती आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या विजयकुमार गायकवाड, नंदकूमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप आणि राजेंद्र कुंभार यांची ओळख करून दिली. त्यांनी आम्ही ब्लॉक ऑरा कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी असून येथील कामकाज आम्ही पाहत आहोत असं सांगितलं.
या सेमिनारमध्ये रियाज पटेल, फिरोज मुलतानी, नितीन जगतीयानी यांनी स्वत:ला कंपनीचे संचालक असल्याचे सांगत गुंतवणूकदारांना कसे जादा पैसे मिळतील हे पटवून दिले. तसेच विजयकुमार गायकवाड, नंदकूमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार हे आमच्या कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी असून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून गुंतवणूक करा असे सांगितले. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधींनी वारंवार काझी यांना संपर्क साधत, तसेच कंपनीचे प्रमुख व संचालक म्हणवणाऱ्या लोकांचे व्हिडिओ पाठवत काझी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
काझी यांनी पैसे गुंतवल्यानंतर सुरुवातीला वेबसाईटवर रक्कम वाढत असल्याचे दिसले. मात्र जेव्हा रक्कम वाढली, तेव्हा मात्र तुम्ही आणखी रक्कम गुंतवा असं त्यांना सांगण्यात आलं. तुम्ही दूसरा युझर-आयडी काढून नव्याने रक्कम गुंतवा असं सांगत पुन्हा रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र त्यांची वेबसाईटच बंद पडू लागली. सुरुवातीला वेबसाईटचा घोटाळा झाल्याचं सांगण्यात आलं. पुढे मात्र ही वेबसाईटच बंद पडली. त्यानंतर काझी यांनी स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधला. लवकरच पैसे मिळतील, काळजी करू नका असं सांगितलं. मात्र पुढे या स्थानिक प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरं देत काझी यांचे तब्बल १० लाख रुपये देण्याबाबत हात वर केले.
याबाबत काझी यांनी बारामती शहर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली. दोन वर्षांपासून ते यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.