'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले होते. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर आणि सून कृतिका सेंगर हे दोघेही कलाकार आहेत. पंकज धीर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पंकज धीर यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अमित बहल यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. माहितीनुसार, पंकज धीर यांना कर्करोग झाला होता. त्यांनी यावर मात देखील केली होती, परंतु काही महिन्यांपूर्वी कर्करोग पुन्हा बळावला. पंकज धीर यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती, पण कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. पंकज धीर गेल्या काही दिवसांपासून खूपच आजारी होते, असे सांगण्यात येत आहे.