तुमच्या भाषणाने लोकांचे पोट नाही भरत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
मुंबई : आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी त्यांच्या काळात अख्ख्या मुंबईत केलेले एक काम दाखवावे, त्याना ते दाखविता येणार नाही. भाषणे ठोकायची आणि निघून जायचे इतकंच त्याना जमते. तुमच्या भाषणाने कुणाचे पोट भरत नाही. विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्याने सामान्याचे पोट भरते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर विशेषतः ठाकरे गटावर हल्लाबोल केला. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच या प्रकल्पाच्या लोकार्पणालाही महायुतीची आमची त्रिमूर्ती उपस्थित राहील असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महानगर प्रदेशातील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार संजय दिना पाटील आदी उपस्थित होते.
45 वर्षांपासून विदारक परिस्थितीत राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर व कामराज नगरमधील नागरिकांच्या स्वप्नातील पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. यासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विकासकांच्या गुंतागुंतीपासून दूर राहून, हे काम थेट शासकीय संस्थांकडून करायचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात आहे.
राज्य सरकारने दोन वर्षांचे आगाऊ भाडे देऊन येथील नागरिकांना तात्पुरत्या निवासाची सोय करून दिली आहे. आता एमएमआरडीए आणि एसआरए यांनी दोन वर्षांतच हे बांधकाम पूर्ण करावे, असेही फडणवीस म्हणाले. पुढील दोन वर्षांत रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथे आधुनिक, सुसज्ज इमारती उभ्या राहतील. या उद्घाटनावेळी पुन्हा आम्हीच उपस्थित राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूह पुनर्विकास धोरणास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना फक्त घरच नाही, तर खेळाचे मैदान, जिम, शाळा, आरोग्य केंद्र अशा सर्व सोयीसुविधा देऊन पुनर्वसन केले जाईल. असे सांगितले. 50 एकरांचे क्लस्टर शोधून ठेवले आहेत, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रमाबाईनगर आणि कामराज नगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीची साक्षीदार आहे. मुंबईच्या विकासात इथल्या कामगार, कष्टकरी बंधू-भगिनींच्या श्रमाचा आणि घामाचा मोठा वाटा आहे.