बोऱ्हाडेंचे उपोषण सोळाव्या दिवशी सुटले; तोडगा काढण्यासाठी शासनाला महिनाभराची मुदत

बोऱ्हाडेंचे उपोषण सोळाव्या दिवशी सुटले; तोडगा काढण्यासाठी शासनाला महिनाभराची मुदत

 

जालना: धनगर समाजाचा एसटी आरक्षण प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी मागील १६ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण गुरुवारी (दि. २) विजयादशमीच्या दिवशी अखेर सुटले. त्यांची कन्या अहिल्या हिच्या हस्ते नारळ पाणी पिऊन दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडले.

आपण आशा सोडली नसून, शासनाने वेळ मागितला आहे. त्यांना वेळ देऊ, आधी ७५ वर्षे आणि आता १६ दिवस थांबलो आणखी महिनाभर वाट पाहू, मात्र निवडणुकीपूर्वीच शासनाने तोडगा काढावा, शारीरिक कमजोरी भरून काढून पुन्हा लढाईला भक्कम उभे राहू, असे स्पष्ट करत लढा आणि सरकार सोबत चर्चाही सुरू राहील, असे दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले.

आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याबाबत उपोषणस्थळी राज्यभरातील अभ्यासक, उपोषणकर्ते, निवडक समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी भावनिक होत अश्रू अनावर झालेल्या दीपक बोऱ्हाडे यांनी बोलताना उपोषणातून मोठा संघर्ष उभा राहिला. आपण सर्व ताकदीने, प्राणपणाने आणि प्रामाणिकपणे लढलो. 

समाज एकजूट झाला, मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी ताकद दाखवून शासनावर दबाव न आणल्याने कमी पडलो, परिणामी लढाई जिंकता आली नाही. आरक्षण अंमलबजावणीचा विजयोत्सव साजरा न करता आल्याबद्दल बोऱ्हाडे यांनी खंत व्यक्त केली. शरीरात भरपूर काही घडलंय डॉक्टर आणि समाज बांधवांच्या सूचनेवरून आपण आज थांबत असलो तरी मरून लढाई जिंकता येणार नाही. मरायचे नाही तर जिंकायचे, असे सांगून श्वास थांबेपर्यंत अहिंसेच्या मार्गाने शांततेत लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तिसरा डोळा उघडायला लावू नका...!

कोणाला शिव्या, जाळपोळ, तोडफोडीने प्रश्न सुटणार नाहीत. अहिंसेच्या मागनि लढा सुरू राहील, असे स्पष्ट करत धनगर समाज हा भोळा असून, आम्हाला तिसरा डोळासुध्दा आहे. सरकार एसटी प्रमाणपत्र सोडून सर्व काही देण्यास तयार आहे. आम्ही आजही आशावादी आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विश्वास तोडू नये, विश्वास तुटला तर तिसरा डोळा उघडण्यास भाग पाडू नये, असा इशारा दीपक बोऱ्हाडे यांनी यावेळी दिला.