“अजित पवारांना आता मोदीही वाचवू शकणार नाहीत”, बावनकुळेंच्या भेटीनंतर अंजली दमानियांचा दावा

“अजित पवारांना आता मोदीही वाचवू शकणार नाहीत”, बावनकुळेंच्या भेटीनंतर अंजली दमानियांचा दावा

 

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत”, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर दमानिया यांनी ही टिप्पणी केली आहे. दमानिया म्हणाल्या, “मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.”

पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मेघदूत बंगल्यावर दमानिया व बावनकुळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.

अजित पवारांना यावेळी कोणीच वाचवू शकणार नाही : अंजली दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या, “मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याच्या फाईल्स हळूहळू बाहेर काढणार आहे. मी यावेळी ठरवलं आहे की मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यातून वाचवलं. मात्र, यावेळी त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही.

“अजित पवारांना कुठल्याही खटल्यातून बाहेर येऊ देणार नाही”

“मी जे घोटाळे बाहेर काढणार आहे, जे पुरावे सादर करणार आहे, ते केल्यानंतर आता अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणाकडेही गेले तरी त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. मी याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशांद्वारे कारवाई होईल याची काळजी घेणार आहे. एकाही खटल्यामधून त्यांना बाहेर येऊ देणार नाही.”

पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आल्यानंतर अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी दमानिया म्हणाल्या होत्या की “अधिकाऱ्यांवर नव्हे तर हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा.”

दमानिया म्हणाल्या होत्या की “पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा.”