"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी नियम वाकवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आलीय का असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
दोन दिवसात स्टॅम्प ड्युटीही माफ
"दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!," असंही अंबादास दानवे म्हणाले.