“७० हजार कोटींच्या आरोपातील १०० कोटी मला द्या, बाकीचे…”, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य
रहिमतपूर: पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगले तापले आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करत एवढ्या मोठ्या व्यवहाराची माहिती नव्हती का सवाल विचारला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी आपल्यावर सध्या होत असलेल्या दोन मोठ्या आरोपांवर अत्यंत स्पष्ट आणि मिश्किल शब्दात भाष्य केले.
"आता घडायला नको होती अशी घटना घडली. मला त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो. काहीजण म्हणाले एवढी मोठी माहिती अजित पवार यांना कशी नाही. अरे बाबा दादा सकाळी सहा वाजता कामाला लागतो, रात्री दहा-अकरा वाजता घरी जातो. त्याच्यामुळे मला माहिती नव्हती. नंतर मी माहिती घेतली पण त्यात काहीच व्यवहार झाला नाही. एक रुपया कुणाला दिला नाही आणि घेतला ही नाही. आता त्यावर तपास करण्यासाठी कमिटी तयार करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे, तिघांवरती गुन्हा दाखल झाला आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.
७० हजारमधील १०० कोटी तरी द्या
"मी काम करताना एका पण माणसाने यावं आणि सांगावं की अजित पवार काम करताना आमच्याकडे चहाचा मिंदा आहे. मी कोणाचाही पाच पैशाचाही मिंदा नाही एवढं माझं काम चोक असतं. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर ७० हजार कोटीचा आरोप झाला. मी म्हटलं ७० हजार कोटी मधले शंभर कोटी मला द्या बाकी सगळे तुम्ही घेऊन जा. १०० कोटी मध्ये माझ्या दहा पिढ्या बसून खातील पण मला कोणी पैसे दाखवत नाही आहेत. यासाठी माझ्या नातेवाईकांवर २२ ठिकाणी धाडी टाकल्या. मला त्याच्यामध्ये खूप त्रास झाला पण मी ते सहन केलं. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेचे प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात काही त्याच्यामध्ये आमचे कौतुक केले जाते काही चुका झाल्या तर आम्हाला नाकारले जाते," असंही अजित पवार म्हणाले.