ठाकरेंच्या वकिलांची कोर्टात मोठी चूक, पृथ्वीराज चव्हाणांचं थेट मुद्द्यावर बोट
तीन महिन्यांची विश्रांती
पृथ्वीराज चव्हाण हे प्रकृतीच्या कारणावरून गेली तीन महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. या दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. दिल्लीहून कराडला आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणी बद्दल बोलताना ते म्हणाले की, ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा चुकीचा युक्तिवाद केला. एका मिनिटात कामकाज संपलं.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
चिन्हाच्या संदर्भातील युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो आता वेळ नाही. निवडणुका हे राजकीय पक्षाचे कामच आहे. त्यासाठी तयार असायला पाहिजे. त्यामुळे निवडणुका होत राहतील, असं कोर्ट म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाचे वकील गप्प बसले. प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो. एक केंद्रीय आणि दुसरी स्थानिक. गेली दहा वर्ष स्थानिक निवडणुकात झालेल्या नाहीत, हा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे होता. मात्र, तो मांडायला ते चुकल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ठाकरे गटाच्या वकिलांनी 'ती' बाब मांडायला पाहिजे होती
भाजपने 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली आहे. त्यामुळे लोकांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार राहिलेला नाही. हा वेगळा विषय आहे. त्याकरिता आम्हाला चिन्हाचा निर्णय स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी द्या, अशी बाजू ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडायला पाहिजे होती. मात्र ती मांडली गेली नाही. आता ती मांडली गेली तरी चालेल. दहा वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. ही महत्त्वाची बाब त्यांनी का नाही कोर्टाला सांगितली, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.