रुपाली पाटील राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, अजितदादांना धक्का, नवा पक्षही ठरला?
मनसेतून राष्ट्रवादीत
काही काळापूर्वीच रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते. अंतर्गत वादाला कंटाळून त्यांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता.
राष्ट्रवादीकडून नुकतीच पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात रुपाली पाटलांसह अमोल मिटकरी यांचीही उचलबांगडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती झाल्यानंतर रूपाली पाटील या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अजित पवार यांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे रूपाली पाटील या उद्या अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस अजित पवार यांची रूपाली पाटील भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या आपला पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुण्यात चव्हाट्यावर आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार, माझा आवाज दाबला जाईल? असा सवाल त्यांनी विचारला होता. प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही; गरज पडली तर “ख्वाडा” करणाऱ्यांचा आहे, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला होता.