खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३८ व्या वर्षातील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा संपन्न

खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३८ व्या वर्षातील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा संपन्न

 

बारामती :- मा.खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नटराज नाट्य कला मंडळ,बारामती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा ‘नटराज करंडक २०२५’ यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. विशेष म्हणजे या स्पर्धेला यंदा ३८ वे वर्ष पूर्ण झाले असून गेली ३८ वर्षे अखंडपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

      या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुणे, मुंबई,सांगली,सातारा,ठाणे तसेच बारामती येथील नामवंत व नवोदित नाट्य संघांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला होता.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत ‘बोहाडा’(मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय,पुणे) या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला.‘पेडल टू मेडल’ (रेवन एंटरटेनमेंट,पुणे) हिला द्वितीय क्रमांक, तर ‘पहिली रात्र’ (क्रिदय एंटरटेनमेंटस, पुणे) हिला तृतीय क्रमांक मिळाला.

    या स्पर्धेसाठी श्रीश देशपांडे,संजय जाधव व विवेक पांडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.त्यांच्या सुक्ष्म निरीक्षणातून व तटस्थ परीक्षणातून निकाल जाहीर करण्यात आला.

   ◼️अभिनय प्रथम स्त्री पारितोषिक वैष्णवी दळवी (नेहा) – पहिली रात्र हिला, तर अभिनय प्रथम पुरुष पारितोषिक मुकुल ढेकले (नाना) – बोहाडा यांना प्रदान करण्यात आले.अभिनय उत्तेजनार्थ स्त्री पारितोषिके अनवी बानकर (रेम्या) – पेडल टू मेडल व श्रावणी मोरे (चिकू) – स्पर्शाची गोष्ट (नक्षत्र कला मंच, मुंबई) यांना, तर अभिनय उत्तेजनार्थ पुरुष पारितोषिक शरण केंगार (कुट्टी) - पेडल टू मेडल यांना जाहीर करण्यात आले.

  ◼️तांत्रिक व विशेष पारितोषिकांमध्ये दिग्दर्शनासाठी रुपेश अहिरे -  पेडल टू मेडल यांना गौरविण्यात आले.वेशभूषा व रंगभूषा पारितोषिक ‘बोहाडा’ या एकांकिकेला देण्यात आले.नवीन लेखनासाठी संकेत मोडक –पहिली रात्र यांना,नेपथ्यासाठी सुरज इप्ते – कांहीतरी अडकलय (मेगो एंटरटेनमेंट,पुणे) यांना,तर प्रकाशयोजनेसाठी संकेत पारखे –पेडल टू मेडल यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले.

     ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हनुमंत घाडगे, प्रशांत काटे,विनय आगवणे, सचिन होळकर,राहुल बनकर व सचिन नागरे आदींनी विशेष मेहनत घेतली.

   या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भव्य- दिमाखात लवकरच संपन्न होणार असून यावेळी विजेत्या एकांकिका,कलाकार तसेच तांत्रिक विभागातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.