नगराध्यक्षपदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारण्याआधीच कामगारांचे आंदोलन स्थगित; सचिन सातव यांची ठाम भूमिका
बारामती: बारामती शहरात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा शहराचे प्रथम नागरिक सचिन सदाशिव सातव यांनी स्वतः उपस्थित राहून भेट दिली.
विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षपदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारण्याआधीच त्यांनी पहिल्याच आंदोलनात आपली ठाम व संवादात्मक शैली दाखवत आंदोलन स्थगित करण्यास यश मिळवले.
“कामगारांचे पगार थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असले तरी प्रत्यक्षात अनेक कामगारांची एटीएम कार्डे आणि त्यांचे पिन क्रमांक संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांकडेच असल्याचे समोर आले आहे. कॉन्ट्रॅक्टदार कामगारांच्या खात्यातील पैसे स्वतः काढून घेतो आणि त्यातील काही रक्कमच कामगारांना दिली जाते,” असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
नगराध्यक्ष सातव म्हणाले की, “हा सर्व प्रकार माझ्या निदर्शनास आलेला आहे. अशा अन्यायकारक पद्धतींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कामगारांचे हक्क हिरावून घेणारा कोणताही कारभार खपवून घेतला जाणार नाही.
त्यामुळे जनतेचे प्रश्न, वेदना आणि अडचणी मला चांगल्या प्रकारे समजतात. सगळं ऐकून घेणं आणि योग्य तो न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि दिलेल्या आश्वासनांमुळे अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यांच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील प्रशासन अधिक संवेदनशीलपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.