वरळीमधील हॉटेलमध्ये ठाकरे शिवसेना आणि भाजपमध्ये राडा; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची घुसखोरी

वरळीमधील हॉटेलमध्ये ठाकरे शिवसेना आणि भाजपमध्ये राडा; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची घुसखोरी

 

मुंबई : वरळी येथील सेंट रेजीस या तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी शिवसेना (ठाकरे) आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. हॉटेलमध्ये कामगार संघटनेचा फलक लावण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गटात जोरदार संघर्ष झाला. या हॉटेलमध्ये शिवसेनेची (ठाकरे) मान्यताप्राप्त संघटना असून भाजपच्या संघटनेने या ठिकाणी आपला फलक लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हॉटेलमध्ये जमा झाले आणि सुमारे अर्धा – पाऊणतास संघर्ष झाला. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने घुसखोरी केल्याची या परिसरात चर्चा सुरू आहे.

वरळी येथील सेनापती बापट मार्गालगत असलेल्या सेंट रेजीस हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. या हॉटेलमध्ये कामगार संघटनेचा फलक लावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र भाजपची संघटना मान्यताप्राप्त नसताना त्यांना फलक लावता येणार नाही अशी भूमिका भारतीय कामगार सेना (ठाकरे) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काही मिनिटातच शिवसैनिक तेथे जमा झाले आणि या परिसरात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी मोठा पोलीस फोजफाटा पोहोचला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटला. यावेळी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

वरळी हा परिसर शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून गेल्या काही वर्षांपासून भाजपने या परिसरात आपला पक्ष मोठा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपने पालिका निवडणुकीच्या तोंडावर रेजीस हॉटेलमध्ये फलक लावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हा वाद सुरू झाला. याबाबत भारतीय कामगार सेनेचे रेजीस हॉटेलमधील पदाधिकारी विवेक कारळकर यांनी सांगितले की, भाजपच्या कामगार संघटनेने उपनगरातील अनेक हॉटेलमध्ये अशा पद्धतीने जबरदस्तीने फलक लावण्यात आले आहेत.

तसाच फलक ते इथे लावायला आले होते. मात्र त्यांना कामगार कायदे माहीत नसावेत. फलक लावण्यासाठी संघटना मान्यताप्राप्त असावी लागते. आमच्या संघटनेचे सर्वात जास्त सभासद असून कंत्राटी कामगारही आमच्याकडे आहेत. भाजपच्या संघटनेने न्यायालयात जाऊन परवानगी आणावी आणि फलक लावावेत, इथे जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा कारळकर यांनी दिला. दरम्यान, ठाकरेंच्या कामगार युनियनमधील काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केला. या फोडाफोडीमुळे कामगार सेना आक्रमक झाल्याचे समजते.