माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम पण अटक टळली; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता. या निर्णयाला स्थगिती मिळावी या मागणीसाठी कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नसली तरी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले होते. त्यामुळेच कोकाटे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती कोकाटे यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाकडे केली. तर, न्यायमूर्ती लढ्ढा यांनी निकम यांची विनंती मान्य करून प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी झाली.
आमदारकी राहणार का?
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढला होता. अखेर गुरूवारी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले. तसेच त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. आता उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे आमदारकीही रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा एखाद्या लोकप्रतिनिधीस सुनावल्यास त्यांचे सदस्यत्व पद रद्द केले जाते. यापूर्वी खासदार राहुल गांधी आणि राज्याचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई झालेली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
प्रकरण काय आहे?
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे सादर करावी लागतात. माणिक कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या.