उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
नाशिक - महाराष्ट्रातील निवडणुका कोणत्या थराला गेल्यात, या महाराष्ट्रात ६०-७० उमेदवार सत्ताधारी पक्षातून बिनविरोध निवडून येतात. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला धमक्या दिल्या जातात, पैसे वाटले जातात. कोट्यवधी रूपयांची ऑफर दिली जाते असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपा महायुतीवर केला.
नाशिक येथे उद्धवसेना-मनसे शिवशक्ती युतीची पहिली जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे म्हणाले की, कल्याण डोंबिवलीत एका प्रभागात कुटुंबातील ३ जणांना १५ कोटींची ऑफर आली. कुणाला ५ कोटी, १० कोटी दिले जातेय हे पैसे कुठून येतायेत? कुणाला उभं राहून द्यायचे नाही. धमकी द्यायची, माणसं विकत घ्यायची हे प्रकार सुरू आहे. जो पक्षात काम करतोय त्याची शून्य किंमत आहे. जी लोक पक्षात कित्येक वर्ष काम करतोय, त्याला बाजूला करून बाहेरची माणसे उभी केली जातात. तीदेखील आनंदाने येत नाहीत तर पैसे घेऊन आणली जातात. राजकारणात त्यांना पोरं होत नाहीत, म्हणून दुसऱ्यांची पोरं पळवत आहेत असा टोला त्यांनी लगावला.
तसेच ४ वर्षापूर्वी मुदत संपूनही महापालिकेच्या निवडणुका का झाल्या नाहीत त्याचे उत्तर आत्ताच्या सरकारने दिले पाहिजे. इतक्या वर्षांनी निवडणुका सुरू आहेत त्यानंतर ज्याप्रकारचा गोंधळ महाराष्ट्रात सुरू आहे. इतका चुकीचा कॅरम फुटलाय, कोणत्या सोंगट्या कोणत्या भोकात आहेत हेच कळत नाहीत. काहीजण वेडे पिसे झाले. एकाने छाननीच्या वेळी एबी फॉर्म गिळून टाकला. कोणत्या थराला या निवडणुका गेल्यात? या महाराष्ट्रात ६०-७० उमेदवार सत्ताधारी पक्षाकडून बिनविरोध निवडून येतात. तिथल्या मतदारांना मतदानाचा अधिकारही देणार नाही? काही वेळा दहशतीतून तर काहींना पैशातून खरेदी केलं जातेय असं राज ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, तपोवनातील झाडे छाटण्याच्या आधी स्वत:च्या पक्षातील लोक छाटले. बाहेरून झाडे मागवली आणि ती पक्षात लावतात. ही कोणती परिस्थिती, २०१७ साली देवेंद्र फडणवीस इथे आले आणि नाशिक दत्तक घेतो असं म्हटले. त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामे केली ते विसरले. दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप पुन्हा फिरकलाच नाही. २०१२ ला आम्ही सत्तेत आलो तेव्हाही कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळी सर्वच पक्षातील नगरसेवकांना सोबत घेऊन काम झाले. तेव्हा एकही झाड कापले नव्हते मग आता का कापले जातायेत, उत्तम कुंभमेळा झाला असे साधू संत म्हणाले, अमेरिकेतही नगरसेवकांचा सत्कार झाला. मग आता काय झाले, तपोवनातील झाडे फक्त तोडण्यापुरती नाही तर उद्योगपतीच्या घशात ही जमीन घालयचे हे प्लॅनिंग त्यांचे आहे असा आरोप राज ठाकरे यांनी भाजपावर केला.
"तेव्हा खूप वाईट वाटले..."
२०१७ साली मला खूप वाईट वाटलं. रतन टाटा, आनंद महेंद्रा, अंबानी यासारखी माणसं इथे आणली आणि शहरात एवढा विकास केला. माझ्या हाती काय आले तर पराभव...ज्या लोकांनी तुम्हाला काहीच दिले नाही त्यांच्या हाती सत्ता दिली. निवडणुका हा खेळ म्हणून ठेवल्यात का? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचे. किती दिवस हे पैसे पुरणार? जर तुम्हाला उत्तम शहर हवे असेल तर नाशिकची सत्ता शिवसेना-मनसेच्या हाती घेऊन पाहा. तुम्ही ताकदीने आमच्यामागे उभा राहा. शिवसेना-मनसेचे १०० नगरसेवक निवडून आणा. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. हे शहर आपल्याला घडवायचे आहे असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.