रोहित पवारांचा गौप्यस्फोट; ४ महिन्यांपासून अजितदादा पक्षात एकटे पडलेले दिसत होते; ''पटेल, तटकरे, अरोरा..'', तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार तथा दिवंगत नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी विमान अपघातावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुरुवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची नावं घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून अजितदादांना एकटं पाडलं जात होतं. त्याबाबत दादा अनेकदा आमच्याशी बोलले आहेत. अपघाताच्या एक दिवस आधी फाईलवर सही झाली पाहिजे, अशी इच्छा एका मोठ्या नेत्याने व्यक्त केली होती. त्याच्यामुळेच दादांना उशीर झाला आणि विमानाने जावं लागलं. ७ वाजून १३ मिनिटांनी विमानाचं बुकिंग झालं.
नरेश अरोरांबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, नरेश अरोरांच्या कंपनीचा शकडो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट दादा रद्द करणार होते. त्यावरुन वादविवाद झाले त्यामुळेच दादा गाडीने जाऊ शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये मी आणि दादा बसलो होतो तेव्हा नरेश अरोराच्या कन्स्लटन्सीचे लोक आले होते. तेव्हाही दादा त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना झापत होते. २७ तारखेलाही शेकडो कोटींच्या या कॉन्ट्रॅक्टबद्दल चर्चा झाली होती. काही ठाराविक नेत्यांची ती भूमिका होती की, हे काम चालूच राहिलं पाहिजे. मात्र अजितदादांची त्यांच्या विरोधातली भूमिका होती. तटकरे त्याबद्दलच बोलत होते, असा मला अंदाज असल्याचं रोहित पवार म्हणाले.
''२७ तारखेला तटकरे साहेब स्वतः उशिरापर्यंत दादांसोबत थांबलेले होते.'' असंही पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे बोलले, '' प्रफुल्ल पटेलांचा एका फाईलसाठी फोन आला होता, त्यामुळेच दादांना निघण्यास उशीर झाला. असं प्रमोद हिंदूराव म्हणालेले आहेत. दादांच्या बाजूने आज कुणीतरी बोलतंय असं मला वाटतंय.'' असं म्हणत त्यांनी पटेल, तटकरे आणि अरोरा यांच्याकडे संशयाचं बोट केलं आहे.
विलिनीकरणाचं काय?
''१२ तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच होणार होती. मात्र सध्या मी अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल आवज उठवत आहेत. मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र ती वेळ मिळालेली नाही. दादांच्या विमान अपघाताची योग्य पद्धतीने चौकशी होत नाही.. त्यामुळे खंत वाटतेय. मी १२ तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्यात कोण कोणासोबत जाणार होतं, याची उत्तरं आहेत. सत्तेत जायचं असतं तर आम्ही कधीच गेलो असतो. सोमवार किंवा मंगळवारी याबाबत मी पत्रकार परिषद घेणार आहे.'' असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.