लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरूवात
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर एक ट्विट करत माहिती दिली.
राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे निधी वितरण थांबवावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. राज्यातील निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने जानेवारी महिन्याच्या निधी वितरणास सुरुवात केली आहे.
जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरूवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.