रोहित पवारांना सुरक्षा मिळणं अत्यंत गरजेचे; सुप्रिया सुळेंची मागणी
मुंबई - अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात आमदार रोहित पवार यांनी सातत्याने विमान अपघातावर शंका निर्माण करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न जनतेच्या मनातही आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत बारामती विमान अपघातावर भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांच्या आरोपानंतर जय पवार यांनीही इन्स्टाग्राम पोस्ट करून वडिलांच्या अपघाती मृत्यूवरून शंका उपस्थित केली आहे.
सखोल चौकशी व्हावी - जय पवार
विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे असे जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे. रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत विमान अपघातावर गंभीर दावे केले. त्यानंतर आता जय पवार यांच्या या विधानामुळे संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.