शेतकरी बंधूनो तुमच्या घरात १० वी १२ वीला मुल आहेत! तर ही बातमी नक्की वाचा

शेतकरी बंधूनो तुमच्या घरात १० वी १२ वीला मुल आहेत! तर ही बातमी नक्की वाचा

 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बोर्डाच्या अंतिम परीक्षेला आता काहीच दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) प्रात्यक्षिक परीक्षांबाबत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि शिस्तबद्ध होणार आहे.

दरवर्षी लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये कॉपी, गैरप्रकार किंवा नियमबाह्य गोष्टी घडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. विशेषतः काही प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने जादा गुण दिले जात असल्याचे प्रकार समोर आले होते. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी बोर्डाने यंदा कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बोर्डाने कोणता घेतला निर्णय?

या निर्णयानुसार, आता लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक परीक्षांसाठीही “भरारी पथक” नेमण्यात येणार आहे. हे पथक अचानक परीक्षा केंद्रांना भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. प्रयोगशाळेतील सुविधा, विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रयोग, जर्नल तपासणी आणि गुण देण्याची पद्धत याची तपासणी केली जाणार आहे. भरारी पथकाला प्रयोगशाळांची छायाचित्रे, विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो तसेच जर्नलचे फोटो काढून थेट मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत.यावर्षी पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांच्या नेमणुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी व अनुदानित शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून पाठवले जाणार आहे. तसेच सरकारी शाळांमधील शिक्षक खासगी शाळांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या अदलाबदलीमुळे ओळखीच्या आधारे गुण देण्याचे प्रकार टाळले जातील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या खऱ्या मेहनतीनुसार गुण मिळतील, असा बोर्डाचा विश्वास आहे.बाह्य परीक्षकांसाठी यंदा विशेष उद्बोधन वर्गाचे आयोजनही करण्यात आले होते. या वर्गामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान नेमके काय तपासायचे, गुण कसे द्यायचे, कोणते नियम पाळायचे आणि कोणती चूक टाळायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षकांकडूनही अधिक जबाबदारीने काम होणार आहे.

यासोबतच परीक्षा केंद्रांसाठीही नवे आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर पक्के भिंतीचे कंपाउंड, स्वच्छ शौचालये, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय आणि प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

एखाद्या केंद्राची भिंत पडलेली असल्यास तिथे लोखंडी जाळी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांना झूमद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जोडले जाणार असून सर्व हालचालींवर थेट नजर ठेवली जाणार आहे.जर एखाद्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार, नियमभंग किंवा फसवणूक आढळली, तर त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाऊ शकते, असा इशाराही बोर्डाने दिला आहे. त्यामुळे यंदाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अधिक कडक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहेत.