उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन, विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही घेणार भेट
पवार कुटुंबियांची परंपरा कायम
प्रितीसंगमाला भेट देऊन सुनेत्रा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची परंपरा कायम राखली आहे. कारण जेव्हा केव्हा महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा पवार कुटुंबिय हे आपले प्रेरणास्थान असलेल्या यशवंतरावांच्या चरणी नतमस्तक होत असतात. हीच परंपरा आता सुनेत्रा पवार यांनी पुढे सुरु ठेवली आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळं शरद पवारांपासून संपूर्ण पवार कुटुंबियांचा राजकीय वारसा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं चालत आला आहे.
विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेणार भेट
दरम्यान, प्रितीसंगमावरुन सुनेत्रा पवार या रवाना झाल्या असून फलटण इथं जाऊन त्या आता अजित पवारांचे अंगरक्षक राहिलेल्या दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्याच विमानात पवारांसोबत विदीप जाधव हे देखील होते. या अपघातात विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंड पिंकी माळी, मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर आणि सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.