माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी 'ही' नावे चर्चेत
बारामती: अजितदादांच्या अकाली जाण्यानं आता माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासह ब वर्ग संचालकपद रिक्त झालं आहे. बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी ब वर्ग संचालकपदाची रिक्त जागा भरण्यासाठी संचालक मंडळ व प्रशासन पातळीवर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ किंवा जय पवार यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळं माळेगावची धुरा कुणावर सोपवली जाते याकडे लक्ष लागलं आहे.
माळेगाव कारखान्याच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अजितदादांनी स्वत: एन्ट्री घेतली होती. त्यांनी ब वर्गातून उमेदवारी दाखल करतानाच अध्यक्षपदही स्वत:कडे ठेवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सहकारी साखर कारखाना आपण कशा पद्धतीने चालवतो हे राज्याला दाखवून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता. या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर अजितदादांनी मोठी काटकसर करत कारखान्याचा कारभार हाकण्यास सुरुवात केली होती.
अजितदादांच्या नेतृत्वात माळेगाव कारखान्यात विविध बदल घडत होते. त्याचवेळी अनाठायी खर्चालाही आळा बसला होता. तसेच कारखान्याच्या प्रगतीच्या अनुषंगाने विविध निर्णयही घेण्यात आले होते. मात्र दि. २८ जानेवारी रोजी अजितदादांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यामुळं आता माळेगाव कारखान्याची धुरा कुणाकडे जाणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर माळेगावचं अध्यक्षपदही सुनेत्रा पवार यांनीच भूषवावं अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे अजितदादांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. या दोघांपैकी एकाकडे माळेगावची धुरा सोपवून तालुक्याच्या राजकारणात त्यांना सक्रिय करावं असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळं आता माळेगाव कारखान्याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, बारामती तालुका खरेदी विक्री संघाने ब वर्ग प्रतिनिधी म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळत आहे. कुणीही असलं तरी अजितदादांच्या कुटुंबातूनच अध्यक्ष निवडला जावा अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त होत आहे.