शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतानचे कार्य ; खासदार शाहू महाराज यांचे वक्तव्य

शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतानचे कार्य ; खासदार शाहू महाराज यांचे वक्तव्य

 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतान कार्य करत होते. शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेतच त्यांनी पुढील वाटचाल केली आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना येथे केले.

राज्यात सध्या टिपू सुलतानवरून राजकीय वातावरण तापलेले असताना शाहू महाराजांच्या या वक्तव्याने नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या बरोबरीबाबत विधान केल्यावरून गेले काही दिवस राज्यात वाद उफाळून आलेला आहे. याचा सर्वत्र निषेध झाल्यावर सपकाळ यांनी माफीही मागितली. याच मुद्द्यावरून विचारले असता शाहू छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी काम करायचे ठरवले होते. आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो. तेव्हा टिपू सुलतानसुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते. तेव्हा ब्रिटिशांना मदत कोणी केली हे पाहण्याची गरज आहे.

शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. राज्य कारभार, प्रशासन आणि शत्रूविरोधातील लढाई यामध्ये शिवरायांनी दाखवलेला आदर्श अनेक राजांनी स्वीकारला होता. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनीही शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पुढे वाटचाल केली आहे, अशा शब्दात त्यांनी टिपू सुलतान यांची प्रशंसाही केली.

दरम्यान इतिहासातील घटनांवर रोज नवनवे वाद होत आहेत, यावर टीका करत शाहू महाराज यांनी इतिहासातून केवळ प्रेरणा घ्याव्यात असेही मत व्यक्त केले.