पुण्यात भाजपा-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने; आंदोलनादरम्यान दगडफेक
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. मात्र, यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे पुण्यात काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून आता तणावपूर्ण शांतता आहे. काँग्रेस भवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
भाजपाने काय म्हटलं?
भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘काँग्रेसकडून आधी दगडफेक करण्यात आली. काँग्रेसचे लोक आक्रमक होऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केला’, असा आरोप भाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
प्रशांत जगताप काय म्हणाले?
“आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काय होतं?
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.