बारामती बाजार समितीचे नामकरण 'अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती' असे केले जाणार

बारामती बाजार समितीचे नामकरण 'अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती' असे केले जाणार

 

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ बारामती बाजार समितीचे नामकरण आता अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती असं केलं जाणार आहे. आज संचालक मंडळाच्या बैठकीत या नामकरणाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबतचा प्रस्तावही पुढील प्रक्रियेसाठी राज्य शासनाला पाठवला जाणार आहे.

बारामती बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाजार समितीचे सभापती विनायक गावडे यांनी बाजार समितीच्या प्रगतीतील अजितदादांचं योगदान लक्षात घेऊन त्यांचं नाव बाजार समितीला देण्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थित संचालकांनी एकमताने मंजूरी दिली. त्यानुसार आता बारामती बाजार समितीचे अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती असे नामकरण होणार आहे.

बाजार समितीद्वारे करण्यात आलेला ठराव राज्याच्या पणन संचालकांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होऊन नामकरणाचे आदेश पारित होणार आहेत. बारामतीची बाजार समिती राज्यात अग्रगण्य होण्यासाठी अजितदादांनी विशेष योगदान दिले आहे. त्याचवेळी या बाजार समितीचा विस्तार करण्यासाठीही अजितदादांनी सातत्यानं प्रयत्न केले होते. त्यामुळं या बाजार समितीला अजितदादांचं नाव देऊन संचालक मंडळाने त्यांच्या कार्याचं स्मरण केलं आहे.