बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, बिनविरोध होणार का?; सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, बिनविरोध होणार का?; सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

 

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या. उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सक्रीय होत अनेक बैठका घेतल्या. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेल्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी स्वीकारली. यानंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले. 

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले. 

बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, बिनविरोध होणार का?

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून त्याकरता निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल. दादा गेल्यानंतर ही पोटनिवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत. त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल. 

दरम्यान, पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याबाबत अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आपल्या संघटनेत काम करत असताना त्यांनी काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.