अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग, डीजीसीए  सुद्धा स्वतंत्र अहवाल देणार

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग, डीजीसीए सुद्धा स्वतंत्र अहवाल देणार

 

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. उच्चपदस्थ व्यक्तींच्या अकस्मात मृत्यू किंवा अपघाताच्या प्रकरणांमध्ये सखोल, निष्पक्ष आणि बहुआयामी तपास व्हावा, या उद्देशाने प्रशासन व न्यायव्यवस्थेकडून सीआयडीकडे तपास सोपविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या प्रकरणात तांत्रिक, प्रशासनिक तसेच धोरणात्मक बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी लवकरच बारामती येथे दाखल होणार आहेत. अपघाताचे नेमके कारण, विमानातील तांत्रिक बिघाड, मानवी त्रुटी किंवा इतर कोणते संभाव्य घटक यांचा तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए ) देखील या अपघाताबाबत स्वतंत्र अहवाल तयार करत असून तो लवकरच सादर केला जाणार आहे. डीजीसीए  आणि स्थानिक तपास संस्थांकडून उपलब्ध प्राथमिक माहितीच्या आधारे काही प्राथमिक निष्कर्ष समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निष्पक्ष व पारदर्शक तपासातून सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.