राष्ट्रवादीचे ठरले… जळगावमधील ‘या’ महिला नेत्याची रुपाली चाकणकरांच्या जागेवर लागणार वर्णी?
जळगाव : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर एसआयटी चौकशी केली जात आहे. खरातची पाद्यपुजा केल्याने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.
दरम्यान, चाकणकरांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आता जळगावमधील एका महिला नेत्याची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे.अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्याशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या छायाचित्रांमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर विरोधकांकडून चाकणकरांवर जोरदार टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, चाकणकर यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि आता पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सुरू असून, अशोक खरातविरोधातील आरोपांची सखोल तपासणी केली जात आहे.
या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्यावर नैतिक दबाव वाढत गेला होता. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरील एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. खरात प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दूरान्वये कोणताही संबंध नाही.
आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत नाराजी व्यक्त करत खोटे, असत्य आणि कोणताही ठोस पुरावा नसताना केले जाणारे आरोप वेदनादायक आहेत. मात्र, सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही नमूद केले आहे.
कोण आहेत त्या महिला नेत्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे देखील म्हटले आहे. या घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरणाचा फटका रुपाली चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात काही महिन्यांपूर्वी प्रवेश केल्यानंतर सध्या प्रदेश प्रवक्त्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जळगावमधील प्रतिभा शिंदे यांचेही नाव त्यासाठी आघाडीवर असल्याचे समजते. लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शिंदे यांनी आदिवासींच्या हक्कासाठी उत्तर महाराष्ट्रात मोठा लढा दिला आहे. एक लढवय्यी कार्यकर्ती म्हणून त्यांनी जनमानसात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.