लाडक्या बहिणांना मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.”
आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे पुढेही सुरू राहील, असा मला विश्वास आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी २२७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
महायुती सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महिलांना जानेवारीपर्यंतचे पैसे देण्यात आले असून, आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे.