यंदाचा उन्हाळा तीव्र उष्णतेचा? वाचा, हवामान विभागाचा सविस्तर अंदाज

यंदाचा उन्हाळा तीव्र उष्णतेचा? वाचा, हवामान विभागाचा सविस्तर अंदाज

 

मुंबई : यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून, पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात मार्च ते मे दरम्यान दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशाचे अन्य भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण, किमान तापमान मात्र सरासरी इतके राहण्याची शक्यता व्यक्त आहे. उन्हाळ्यात संपूर्ण पूर्व किनारपट्टी, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा. राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या उष्णतेच्या लाटांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरासरी बारा ते पंधरा दिवस उष्णतेच्या लाटांचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा उष्ण राहिला. फेब्रुवारी महिन्यात देशाचे कमाल तापमान सरासरी २७.५८ अंश सेल्सिअस असते. यंदाच्या फेब्रुवारी ते २८.७८ अंश सेल्सिअस राहिले. किमान तापमान १३.८२ अंश सेल्सिअस असते, ते १४.७६ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमान १.०७ आणि किमान तापमान ०.९४ अंश सेल्सिअसने जास्त राहिले. गतवर्षी किमान तापमान १५.०२ अंश सेल्सिअस होते. फेब्रुवारीमध्ये देशात सरासरीच्या तुलनेत ८१.३ टक्के पाऊस झाला. देशात फेब्रुवारी महिन्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस पडतो, यंदा तो ४.२ मिमी पडला.

१९०१ पासूनच्या हवामान नोंदीनुसार यंदा तिसऱ्या क्रमांकाचा उष्ण फेब्रुवारी महिना ठरला. फेब्रुवारी महिन्यात नऊ पश्चिमी विक्षोप म्हणजेच थंड हवेचे झोत उत्तर भारतात सक्रिय राहिले. त्यापैकी १ ते ३, १७ ते १९ आणि २३ ते २५ फेब्रुवारी हे तीन पश्चिमी विक्षोप जास्त परिणामकारक ठरले. पश्चिमी विक्षोपांचा मध्य महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम झाला नाही. परिणामी राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पश्चिमी विक्षोपांचा प्रभाव जास्त राहिला तर महाराष्ट्रात थंडी, थंडीची लाट येते. यंदा फेब्रुवारीचा पहिल्या आठवडा वगळता त्यानंतर थंडी फारशी पडली नाही.

यंदा पावसाळ्याची सुरुवात दमदार ?

प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती उन्हाळ्यात तटस्थ राहण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. पण, हवामान विभागाने त्याला दुजोरा दिलेला नाही.

मार्चमध्ये विदर्भात पाऊस ?

फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तरीही मार्च महिन्यात मात्र सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रामुख्याने विदर्भात पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात देशात सरासरी २९.७ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.