माळेगांव: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने एचडीएफसी बँक च्या सीएसआर निधीतून शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ला तब्बल १०१ लॅपटॉपची देणगी देण्यात आली. या लॅपटॉपचे भव्य हस्तांतरण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उत्साहात आणि दिमाखात पार पडले.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठे बळ मिळणार आहे.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या शैक्षणिक विकासाला नवे बळ मिळाले आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एचडीएफसी बँकेच्या सीएसआर निधीतून १०१ लॅपटॉप संस्थेला प्रदान करण्यात आले.
या लॅपटॉपचा स्वीकार संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, डॉ. निलेश नलावडे तसेच संस्थेच्या विश्वस्तांनी केला. कार्यक्रमाला एचडीएफसी बँकेकडून स्वाती शाळीग्राम, विदुला देशपांडे आणि दत्ता राजूरकर उपस्थित होते.
डिजिटल शिक्षणासाठी मोठे पाऊल
अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि डॉ. संतोष भोसले यांच्या पुढाकारातून संस्थेला अनेक शैक्षणिक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये१०१ लॅपटॉप, ३६ इंटरॲक्टिव्ह स्मार्ट स्क्रीन, शाळांसाठी दोन अत्याधुनिक STEM लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल तसेच प्रयोगाधारित शिक्षणाची मोठी संधी मिळणार असून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दर्जामध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठीही संस्थेकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ३०० सायकलींची मंजुरी देण्यात आली आहे.तसेच ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थिनींच्या आरोग्य व शिक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
आधुनिक शिक्षणसंस्थेचा संकल्प
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्था उभारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. त्या दिशेने एचडीएफसी बँकेने दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे. भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी अशाच प्रकारचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे, प्रवीण पोंदुकुले, रोहन देवकाते, डॉ. मोहन नेवसे, गणपतराव देवकाते,आशा जराड, कृषिभूषण प्रल्हाद वरे, गौरव जाधव तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, नगरसेवक आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.