रोहित पवारांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत केली चर्चा

रोहित पवारांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत केली चर्चा

 

दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघात की घातपात असा सवाल उपस्थित करत व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या दिल्लीत प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठीही सुरू असून मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांची भेट घेतली.

रोहित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली. याआधी त्यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांचीही भेट घेतली होती. आता त्यांनी संसदेच्या आवारामध्ये काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांची भेट घेत अजित पवार अपघात प्रकरणावर चर्चा केली.

डीजीसीएच्या त्रुटी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या कामकाज संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते.